बाळूमामा देवस्थानात ६०.७४ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा स्फोट; माजी पदाधिकाऱ्यांसह संबंधितांविरोधात गुन्हा

👤 आदमापुर प्रतिनिधी | 📅 22 July 2026 | 👁 319 Views
 बाळूमामा देवस्थानात ६०.७४ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा स्फोट; माजी पदाधिकाऱ्यांसह संबंधितांविरोधात गुन्हा
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत सद्गुरु बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ६० कोटी ७४ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले असून, धर्मादाय विभागाच्या तक्रारीवरून भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

धर्मादाय आयुक्त मुख्यालय, मुंबई येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच संबंधित सदस्य आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

देवस्थानाच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायिक अधिकारी एम. बी. लंबे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

फिर्यादीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या सहा वर्षांच्या कालावधीत ट्रस्टच्या निधीचा कथित गैरवापर, आर्थिक व्यवहारांतील अनियमितता, लेखापरीक्षणातील त्रुटी आणि देवस्थानच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. या कथित गैरव्यवहाराची रक्कम ६० कोटी ७४ लाख रुपये इतकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ट्रस्टमध्ये एकूण २१ विश्वस्त असतानाही सध्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासादरम्यान आणखी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गुन्हा रविवारी रात्री दाखल झाल्यानंतरही सोमवारी सायंकाळपर्यंत एफआयआरची प्रत उपलब्ध करून देण्यात विलंब झाल्याची चर्चा आहे. याबाबत "क्रॉस गुन्हा दाखल होणार असल्याने त्यानंतर एफआयआरची प्रत दिली जाईल," असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भुदरगड पोलिस ठाण्याचे फौजदार अली अहमद मुल्ला करत असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा देवस्थानातील या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता तपासाच्या पुढील घडामोडींवर लागले आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |