आजची आग इशारा की उद्याची मोठी दुर्घटना? नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संतप्त सवाल
अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात रविवारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरले. या आगीत अनेक छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेने शहरातील अनधिकृत पत्र्यांच्या शेड्स, अतिक्रमण आणि अग्निसुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरालगत बाळ रुग्णालय असून अनेक दुकानांवर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी ३३ केव्ही वीजवाहिन्यांचे खांब, तर काही दुकानांसमोर वीज वितरणाचे डीपी असल्याने संभाव्य धोका अधिक वाढल्याची नागरिकांची भावना आहे.
अंबड शहरातील मुख्य बाजारपेठ, प्रमुख चौक आणि रहदारीच्या मार्गांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत होणारी प्रचंड गर्दी, रस्त्यावरची बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका कायम निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आजची आग ही केवळ अपघाती घटना नव्हे, तर शहर नियोजन, अतिक्रमण नियंत्रण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
"आणखी किती मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार?" असा संतप्त सवाल अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील अतिक्रमणावर कठोर कारवाई, धोकादायक पत्र्यांचे शेड हटविणे, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि अग्निसुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.