कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा यांना जोडणाऱ्या बांबवडे - कोकरूड जिल्हा मार्गावर वाडीचरण,सरूड,शिवारे,माणगाव,भेडसगाव या गावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बांबवडे व कोकरूड या ठिकाणी जातात. मलकापूर आगारामार्फत या जिल्हा मार्गावर बस सेवा पुरविली जाते.पण आगाराच्या भोंगळ कारभारामुळे या मार्गावरील बस सेवेचे वेळापत्रक कायम कोलमडलेले असते. नादुरुस्त गाड्या, गळक्या गाड्या, या मार्गावर चालत असतात. त्यात त्याही वेळेत नसल्याने सदर गावातील विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागते.त्यामुळे वेळेत शाळा,कॉलेजमध्ये न पोहोचल्यामुळे त्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. वेळेवर शाळेत पोहोचण्याचे असल्याने सदर विद्यार्थी खाजगी वाहनांचा आधार घेऊन आपला व घरच्यांचा जीव टांगणीला लावत आहेत.
त्यामुळे या भोंगळ कारभारा विरुद्ध प्रवाशांनी आणि नागरिकांनी बर्याच वेळा निवेदन दिले आहे. पण याचा परिणाम आगार व्यवस्थापक यांच्यावर झाल्याचे दिसून येते नाही. त्यामुळे लवकरात लवकर आगार व्यवस्थापक यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी व विद्यार्थी - पालक यांनी केली आहे. अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.