सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत लाक्षणिक उपोषण

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 206 Views
सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत लाक्षणिक उपोषण
देशातील विद्यार्थीं आणि शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी लडाखचे पर्यावरणीय आणि सामाजिक कार्यकर्ते, संशोधक सोनम वांगचुक यांनी गेले १८ दिवस दिल्लीत सुरु ठेवलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 'आम्ही भारतीय' यांच्या वतीने आज गुरुवारी कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या उपोषणाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना नैतिक बळ देण्याबरोबच २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या संसद मोर्चाला देखील समर्थन देण्यात आले. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी या उपोषणात सहभागी होऊन सोनम वांगचुक यांना पाठींबा दिला.

याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले, देशातील चळवळींना पाठिंबा देणारा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. पंधरा वर्षांपूर्वी आण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देखील अशीच चिंगारी कणकवलीत पेटली होती. सरकार कोणाचेही असले तरी सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्याची जबाबदारी नागरिकांचीही असते आणि या उपोषणाच्या माध्यमातून आपण ती जबाबदारी पार पाडत आहात त्याबद्दल तुमचे कौतुक आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याने आणि भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आत्महत्या केली. याला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी देशातील विद्यार्थ्यांची मागणी असून त्यासाठी सोनम वांगचुक गेल्या १८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.त्यांची प्रकृती देखील खालावली आहे. देशात अनेक ठिकाणी नागरिक त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. मात्र केंद्रातील भाजप सरकार त्यांच्या उपोषणाकडे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारला जाग आणली पाहिजे असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.

सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील उपोषणाला आज १८ दिवस झाले. एवढे दिवस उलटूनही सरकारकडून त्यांची दखल घेतली गेली नाही. सततच्या उपवासामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून, त्यांच्या जीविताची जबाबदारी आता संपूर्ण सरकारची आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत भविष्यात अशा प्रकारच्या अन्यायकारक घटना पुन्हा घडू नयेत, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये आणि देशातील शिक्षण व्यवस्थेवरील सामान्य नागरिकांचा विश्वास अबाधित रहावा हा या उपोषणाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी मनोगतामधून स्पष्ट करत सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांवर टीका केली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सरकारवर प्रचंड रोष व्यक्त केला.

याप्रसंगी मालवणचे सामाजिक कार्यकर्ते नितीन वाळके, सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, माजी नगरसेवक विलास कोरगावकर,संजय वेतुरेकर,नामानंद मोडक, प्रवीण वरुणकर, अर्पिता मुंबरकर, संदीप कदम, तेजस राणे,धीरज मेस्त्री, विलास गुडेकर, गुरु पेडणेकर, सहदेव पारकर, राजेंद्र कदम, रुपेश रेवडेकर, सुरेश रासम, विनायक सापळे, डॉ. सीमा दळवी,संदीप सावंत, सचिन तांबे,डी. आर. रेवडेकर, राहुल कदम, राहुल कांबळे, मेगल डिसोजा, फिजा मकानदार, पंढरीनाथ गुरव, गौतम तांबे, शशिकांत कदम, मुख्तार गडकरी, सोहम पुजारी, विघ्नेश पवार, प्रणाल परब, अशोक कदम आदी युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. |