आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांकडून चांगल्या वर्तनाचे धडे
सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीत वारकऱ्यांची लूट व चोरीच्या घटना टाळण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी रेकॉर्डवरील ३५३ सराईत गुन्हेगारांना पोलिस मुख्यालयात बोलावून शांतता राखण्याची तंभी देत चांगल्या वर्तनाचे धडे दिले.संतांचे पालखी सोहळे व आषाढी वारीनिमित्त १९ ते २९ जुलैदरम्यान सोलापूर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार आहे. या काळात महाराष्ट्रासह परराज्यांतून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतील सुमारे १० हजार पोलिस तैनात केले जाणार आहेत.
वारीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेले आरोपी, हिस्ट्रीशीटर आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिस मुख्यालयात बोलावण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात ८१, तर गुरुवारी अक्कलकोट, बार्शी आणि मंगळवेढा येथील २७२ जण उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप आदी उपस्थित होते.
सोलापूर : आषाढी वारीपूर्वी ग्रामीण पोलिसांच्या पोलिस मुख्यालयात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चांगल्या वर्तनाचे धडे देताना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस निरीक्षक संजय जगताप.
चांगल्या वर्तणुकीचे घेतले हमीपत्र
रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे हमी पत्र घेण्यात आले. तसेच त्यांची नोकरी, व्यवसाय व रोजगाराची माहितीही घेण्यात आली. पारधी समाजातील उपस्थितांना 'पहाट' उपक्रमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. इतरांनाही आगामी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यात कोणताही गुंन्हा केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस अधीक्षकांनी दिला.