सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षपदी स्वप्निल पाटील यांची बिनविरोध निवड
👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग |
📅
11 July 2026 |
👁 172 Views
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी संस्थेच्या उपाध्यक्षपदी श्री.स्वप्निल श्रीकांत पाटील यांची एकमताने व बिनविरोध निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. १० जुलै २०२६ रोजी पतपेढीच्या मुख्य कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी ठीक ३.०० वाजता संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी श्री. प्रशांत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपाध्यक्ष पदासाठी विहित मुदतीत केवळ श्री. स्वप्निल पाटील यांचाच अर्ज आल्याने, अध्यासी अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
स्वप्निल पाटील हे माधवराव पवार माध्यमिक विद्यालय, कोकिसरे (ता. वैभववाडी) येथे गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी प्रशांत आडेलकर, सुरेंद्र लांबोरे, संदीप कदम, प्रदीप सावंत, श्रीमती विद्या शिरसाट, सुरेश चौकेकर, संजय वेतुरेकर, समीर परब यांनी आपल्या मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर, श्री. सुरेश चौकेकर, शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत आडेलकर, पतपेढीचे अध्यक्ष श्री. समीर परब यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य,दत्तात्रय मारकड रामचंद्र घावरे, श्री. राजाराम माने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पतपेढीचे सर्व कर्मचारी, तसेच स्वप्निल पाटील यांच्या मातोश्री श्रीम. शोभा पाटील,सहचारिणी सौ. नीलम पाटील, बंधू प्रसाद पाटील उभयता उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना श्री. स्वप्निल पाटील यांनी संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सभासदांचे हित जपत पारदर्शक कारभार, नाविन्यपूर्ण योजना, आर्थिक शिस्त आणि पतपेढीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.त्यांच्या निवडीने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.