इंद्रायणी नदीला महापूर! आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना 'आहात तिथेच थांबा'चे आवाहन.आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मावळ भागात आणि धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून पाणी सोडल्याने आळंदी येथील इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. आळंदी शहराला जोडणारे इंद्रायणीवरील चारही मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करणे धोकादायक झाले आहे.नदीच्या दोन्ही घाटांवर पाणी शिरले आहे. नदीकाठच्या घरे, धर्मशाळा आणि वारकरी संस्थांमध्येही पाणी घुसले आहे. शनिमंदिर आणि सिद्धबेट परिसरातही पाणी आले आहे घाटावर आषाढी वारीसाठी लावलेल्या चेंजिंग रूम पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. दुकानदारांनी आपले साहित्य हलवले आहे. त्यामुळे सर्व वारकरी बंधू-भगिनी आणि पांडुरंगाच्या भक्तांना प्रशासनाकडून नम्र आवाहन करण्यात आले आहे की आपण आळंदीला येऊ नये.