सरडेवाडीतील अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना दिलासा; दानशूर नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन
मदतीचा तपशील :
कै. रामचंद्र जमदाडे यांच्या कुटुंबीयांना ₹३० हजारांची मदत
जखमी बिपीन मोरे व संतोष माने यांना मिळून ₹२५ हजारांची आर्थिक मदत
संकटाच्या काळात समाजाने समाजासाठी धावून जाण्याचा आदर्श अखिल भारतीय मराठा महासंघ, भिगवण शाखेने घालून दिला आहे. सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील युवक मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी (जि. बीड) येथे गेले असता, परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात रामचंद्र जमदाडे यांचा मृत्यू झाला, तर बिपीन मोरे व संतोष माने हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या भिगवण शाखेने लोकवर्गणीतून जमा केलेला ₹५५ हजारांचा मदतनिधी संबंधित कुटुंबांना सुपूर्द केला.मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने निधी उभारून सामाजिक बांधिलकी जपल्याचे यानिमित्ताने दिसून आले. कै. रामचंद्र जमदाडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तसेच जखमी बिपीन मोरे हे मोलमजुरीवर उदरनिर्वाह करत असल्याने त्यांच्यासमोरही आर्थिक संकट उभे आहे.
यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबांना यथाशक्ती आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या भिगवण शाखेच्या वतीने करण्यात आले. दुःखाच्या प्रसंगी आर्थिक मदतीसोबत मानसिक आधारही तितकाच महत्त्वाचा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.