राजे रामराव महाविद्यालयात ‘ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्रा’चे लोकार्पण

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 23 June 2026 | 👁 428 Views
राजे रामराव महाविद्यालयात ‘ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्रा’चे लोकार्पण
महान विभूतींच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी घ्यावी प्रेरणा; पुतळे आत्मचिंतनाची केंद्रे बनली पाहिजेत – प्राचार्य अभयकुमार साळुंखे

शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीची अखंड प्रेरणा देणाऱ्या चार महान विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांनी सजलेल्या ‘ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्रा’चे लोकार्पण राजे रामराव महाविद्यालय, जत येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी, “पुतळे हे केवळ स्मारके नसून प्रेरणा आणि आत्मचिंतनाची ऊर्जा देणारी केंद्रे आहेत. या पुतळ्यांसमोर उभे राहिल्यानंतर प्रत्येकाने स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करावा आणि त्या महान व्यक्तींच्या कार्यातून जीवनाला दिशा मिळवावी,” असे प्रतिपादन केले.
जत संस्थानातील शिक्षण चळवळीचे उदार आश्रयदाते श्रीमंत रामराव महाराज डफळे, ज्ञानतपस्वी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. महाविद्यालयाच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेले हे ‘ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्र’ भविष्यात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाशकाका पाटील होते. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजितराजे डफळे सरकार, संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, माजी अर्थसचिव पी. एस. चव्हाण, आजीव सेवक कृष्णा बिसले, प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप, डॉ. विठ्ठल ढेकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*‘ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्र’ ठरणार प्रेरणेचे विद्यापीठ* महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलेले ‘ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्र’ हे केवळ चार पुतळ्यांचे स्मारक नसून शिक्षण, संस्कार, त्याग, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा या मूल्यांचे प्रतीक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला महान विभूतींच्या विचारांचा स्पर्श होऊन जीवनात उच्च ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे हे स्थळ महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ठरणार आहे.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना या उपक्रमामागील प्रेरणा आणि प्रयत्नांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, महाविद्यालयाचे आजी-माजी प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि संस्थेचे हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून दहा लाख रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला. या सामूहिक योगदानामुळेच आज हे प्रेरणादायी तीर्थक्षेत्र साकार होऊ शकले आहे.
प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या भाषणात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ग्रामीण, वंचित, उपेक्षित आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्याचबरोबर श्रीमंत रामराव महाराज डफळे यांनी जत संस्थानात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी केली. या चार महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळावी आणि शिक्षणातून समाजसेवेची जाणीव निर्माण व्हावी, यासाठीच हे पुतळे उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. जयसिंगराव सावंत, अर्जुन सवदे, शिवकिरण बामणे, डॉ. शुद्धमती फुलसागर, डॉ. शिवाजीराव बिसले आणि प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या जडणघडणीतील आठवणींना उजाळा दिला. या महाविद्यालयाने घडविलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा उल्लेख करत त्यांनी ‘ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्र’ ही भावी पिढीसाठी प्रेरणेची अखंड ज्योत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
समारंभास प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर, सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस. के. होर्तीकर, अशोक पवार, प्रकाश हाके, डॉ. परमानंद भोसले, प्राचार्य कायला, प्रा. श्रीमंत ठोंबरे, प्रा. चंद्रसेन मानेपाटील, सिद्राम चव्हाण, उपप्राचार्य प्रा. कृष्णा रानगर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, प्रभाकर जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर व डॉ. रामदास बनसोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |