इकडे परत यायचं नाही’ म्हणत अमोल राऊतची दहशत; इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
शेतजमिनीकडे जाणारा रस्ता खुला करावा, या साध्या मागणीसाठी तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्याला न्यायाऐवजी लाथाबुक्क्यांचेच दान मिळाले. तहसीलदारांना स्मरणपत्र देऊन परतणाऱ्या नागरिकांना तहसीलच्या आवारातच अडवून अमोल राऊत याने शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आंबिकानगर येथील अमोल प्रभाकर कारंडे, 38 हे शेतकरी मित्र अविनाश नवगिरे, संतोष गोरे व राजेश झगडे यांच्यासह गट नं. 332/1/3/1 मधील वहिवाटीचा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी तहसील कार्यालयात गेले होते. निवेदन देऊन बाहेर पडताच अमोल उत्तम राऊत याने त्यांना गाठले.
“तू काहीही कर, तुला रस्ता मिळणारच नाही. परत इथे दिसलास तर याद राख,” अशी दमदाटी करत राऊतने कारंडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भेदरलेल्या इतर तिघांनाही ‘जिवे मारू’ अशी धमकी दिली.
तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी, दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “दाद मागायला आलेल्यांनाच जर मारहाण होत असेल तर सामान्यांनी जायचे कुठे?” असा सवाल उपस्थित होत आहे.
याप्रकरणी अमोल कारंडे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी अमोल राऊतविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सलमान खान अधिक तपास करत आहेत.