सत्रेवाडी ग्रामपंचायत चौकशीला दोन महिने उलटले, तरीही पंचायत समितीकडून अहवाल 'गुलदस्त्यात'!

👤 आकाश दडस सातारा | 📅 05 June 2026 | 👁 121 Views
सत्रेवाडी ग्रामपंचायत चौकशीला दोन महिने उलटले, तरीही पंचायत समितीकडून अहवाल 'गुलदस्त्यात'!
माण तालुक्यातील सत्रेवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, पंचायत समितीच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. मार्च महिन्यात अत्यंत गाजावाजा करत झालेल्या या चौकशीचा अहवाल पंचायत समितीने अद्यापपर्यंत का दडवून ठेवला आहे? असा संतप्त सवाल आता सत्रेवाडीतील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत स्थानिक पातळीवरून तीव्र हरकती व तक्रारी घेण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी २४ मार्च २०२६ रोजी स्वतः ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून या प्रकरणाची चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान एकूण १० गंभीर मुद्द्यांवर तपासणी करण्यात आली होती. जन्म-मृत्यू नोंदींमध्ये खाडाखोड करणे व दाखले न देणे. सरपंच सतत गैरहजर असणे आणि त्यांच्या खुर्चीवर इतर अनधिकृत व्यक्तींनी बसणे. सरपंचांच्या अनुपस्थितीत त्यांचे 'मिस्टर' (पती) बेकायदेशीरपणे कारभार पाहत असणे.कोणताही ठराव न घेता कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी देणे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी योग्य रितीने खर्च न करणे. टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता न ठेवता एकाच ठेकेदाराला झुकते माप देणे. माजी सरपंच आणि सदस्यांचे मानधन वेळेवर न देणे.या सर्व गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यांवर गटविकास अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी करून दोन महिने उलटून गेले आहेत. नियमानुसार चौकशी झाल्यानंतर तात्काळ त्याचा अहवाल सादर करून दोषींवर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, मे महिना संपत आला तरीही पंचायत समितीच्या वतीने हा अहवाल अधिकृतपणे समोर आणण्यात आलेला नाही.चौकशीचा अहवाल इतके दिवस प्रलंबित राहिल्यामुळे 'यात नक्की काय गौडबंगाल आहे?' अशी चर्चा आता संपूर्ण माण तालुक्यात रंगू लागली आहे. दोषींना पाठीशी घालण्यासाठी तर हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न होत नाही ना? अशी शंका ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीने तात्काळ हा चौकशी अहवाल जाहीर करावा, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांमधून दिला जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |