कोणताही लोकसेवक किंवा खाजगी व्यक्ती (एजंट) शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी तातडीने एसीबी सोलापूर कार्यालयाशी किंवा टोल फ्री क्रमांक १०६८ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
सोलापूर - जन्म-मृत्यू नोंदणी संदर्भातील आदेश मिळवून देण्यासाठी २,००० रुपयांची लाच घेणाऱ्या पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला आणि त्याच्या एका खाजगी साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज, १ जून २०२६ रोजी पंढरपूर येथे करण्यात आली.आरोपींची नावे अलीफ शमशुद्दीन सुतार (वय २९, पद- महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय पंढरपूर, रा. मंगळवेढा) , मारुती ज्ञानोबा वाघमारे (वय ५०, खाजगी इसम, रा. येळगी, ता. मंगळवेढा)
तक्रारदार हे वकिली व्यवसाय करतात. त्यांच्या पक्षकाराच्या जन्म-मृत्यूची नोंद होण्यासाठी तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होऊन आदेश मिळणे आवश्यक होते. हा आदेश लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी लोकसेवक अलीफ सुतार याने २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाचेची रक्कम त्याने स्वतः स्वीकारली, तर या संपूर्ण प्रकरणात खाजगी इसम मारुती वाघमारे याने मध्यस्थी/मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.
एसीबीची यशस्वी कारवाई:
तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली होती. त्यानुसार २९ मे २०२६ आणि आज १ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. आज १ जून रोजी एसीबीने पंढरपूर येथे सापळा रचून आरोपी अलीफ सुतार याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
या दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ आणि ७ अ प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील व श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक श्री. शैलेश पवार, रवींद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली आहे.