सहाव्या टप्प्याच्या कामांना गती मिळणार : आ. सुहास बाबर
टेंभू उपसासिंचन योजनेचे कार्यालय सांगली येथून विटा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने घेतला असून, या निर्णयामुळे खानापूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मागणी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यानंतर विद्यमान आमदार सुहास बाबर यांनीही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत ही मागणी पूर्णत्वास नेली.महामंडळाने जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्र. १, सांगली हे कार्यालय आता विटा येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. विटा हे टेंभू योजनेचे मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगांव, कडेगाव, माण खटाव व सांगोला तसेच परिसरातील अनेक भागांशी विट्याचा थेट संपर्क असल्याने या कार्यालयाच्या स्थलांतराचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. विशेषतः टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, संबंधित अभियंते व अधिकारी प्रकल्प क्षेत्राच्या अधिक जवळ राहणार असल्याने कामकाजात समन्वय वाढून गती मिळेल.
स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने शासन दरबारी आवाज उठवला होता. त्याच भूमिकेतून विटा येथे कार्यालय आणण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या पश्चात आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून घेतली.
या निर्णयानंतर आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार असून, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना कामासाठी सांगलीपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. तसेच टेंभू योजनेच्या कामांवर अधिक प्रभावी नियंत्रण राहील, स्थानिक पातळीवरील तक्रारी व प्रश्न तातडीने निकाली निघतील तसेच शेतकऱ्यांना प्रशासनाशी थेट संपर्क साधणे अधिक सोपे होईल, असा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला.