सांगलीतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
👤 राहुल टिबे सांगली |
📅
26 June 2026 |
👁 327 Views
सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी सांगली जिल्ह्यात अन्न भेसळ, दूध भेसळ, बनावट मावा, गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर आरोग्यास घातक पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत सांगलीचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करून निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र संबंधित विभागाकडून अपेक्षित प्रमाणात धडक कारवाया होत नसल्याने नागरिक, ग्राहक आणि शेतकरी यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
विशेषतः आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यात यापूर्वी गुटखा विक्रेत्यांवर नियमित कारवाया होत होत्या. मात्र गेल्या काही काळात अशा कारवायांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून, पूर्वी कारवाया होत असताना आता त्या कमी का झाल्या, याची स्वतंत्र चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच मागील तीन वर्षांतील दूध भेसळ, बनावट मावा, गुटखा व इतर भेसळयुक्त पदार्थांवरील कारवायांचा अहवाल जाहीर करावा, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, आवश्यक असल्यास अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नवीन अधिकारी नियुक्त करावेत, तसेच गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
दूध भेसळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून, भेसळयुक्त दुग्धव्यवसायामुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनहिताच्या दृष्टीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे.