विशेष प्रतिनिधी
शाळा सुटल्यानंतर घरी परतण्याचा प्रवास एका विद्यार्थ्यासाठी अखेरचा ठरला. उमाळा येथील माध्यमिक विद्यालयातून कंडारीकडे खासगी वाहनाने जात असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अर्जुन उर्फ प्रदीप प्रल्हाद कोळी (वय १६, रा. कंडारी, ता. जळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन हा उमाळा येथील माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शाळा सुटल्यानंतर तो इतर विद्यार्थ्यांसोबत खासगी वाहनाने कंडारी येथे घरी परतत होता. प्रवासादरम्यान अचानक वाहन उलटल्याने मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत अर्जुनसह नऊ विद्यार्थी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्जुनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोदावरी महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
अपघातामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
अर्जुनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला. शालेय जीवनातच त्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कंडारी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
नशिराबाद पोलिसांकडून नोंद
या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाहन उलटण्यामागील नेमके कारण आणि अपघाताची परिस्थिती याबाबत पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. लेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांची ने-आण करताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.